आमच्या 'भुलाबाई' अन कोजागिरी !!
काल कोजागिरीच्या निमित्त्यानं बालपणीच्या खूप आठवणीना उजाळा मिळाला ....आधी शिक्षणासाठी मग नोकरीसाठी आम्ही गावाबाहेर पडलो आणि मग हळूहळू अशा सणाची गंमत कधी मागे पडत गेली कळलंच नाही. काल कित्येक वर्षांनी या छोट्याशा सणाचा मोठा आनंद घेता आला कारण हि तसंच होतं. लोकडाऊनमध्ये गावी राहता आलं त्यामुळं बऱ्याच वर्षांनी विदर्भात साजऱ्या होणाऱ्या कोजागिरी अन 'भुलाबाईचा' आनंद घेता आला.
कोजागिरी तर महाराष्ट्रात किंवा बाहेर कुठेही साजरी होते पण 'भुलाबाई' बसवून ती साजरी करण्याची एक वेगळी प्रथा आमच्या गावाकडे आहे. विदर्भात काही खेड्यांमध्ये भाद्रपद पौर्णिमा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे सलग एक महिन्याच्या, तर काही ठिकाणी कोजागिरीच्या दिवशी 'भुलाबाईचं' आगमन करतात. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.
'भुलाबाई' हे नावं कसं पडलं हे तर मला सांगता येणार नाही पण आजी सांगायची भुलाबाई (पार्वती) आणि भुलोजी (शंकरजी )आहेत. या दोघांच्या दोन वेगळ्या किंवा एकत्र बसलेल्या मातीच्या छोट्या आकाराच्या मुर्त्या तयार केल्या जातात. हल्ली मात्र अशा मुर्त्या बाजारात विकतच मिळतात. भुलोजीला शेतकऱ्यांसारखा फेटा, सदरा आणि धोतरं घातलेलं असतं आणि भुलाबाईला साडी किंवा लुगडं नेसवलेलं असतं. तिच्या मांडीवर एक छोटं बाळही असतं. या मुर्त्या फारच आकर्षक रंगानी रंगवलेल्या असतात. या लोकखेळाचे मूळ कृषी परंपरेतून आलेले आहे म्हणून अशा पद्धतीचा पोशाख केला गेला असावा.
तिन्ही सांजेच्या वेळेला अंगणात किंवा घरात ज्वारीच्या धांडे (खोपडी (इकडचा प्रचलित शब्द) किंवा ऊसाचे खोडं घेऊन त्यांचा मंडप घातला जातो.
त्याच्या खाली पाट मांडून भुलोजीला बसवलं जातं. पूजा आरती केली जाते आणि मग खरी मज्जा सुरु होते ती इथल्या वेगळ्या पद्धतीचे गाणे गाण्याची.... छोटी मुलं- बाया मोठ-मोठयाने टाळ्यांच्या गजरात, टिपऱ्या वाजवत, बैठे खेळ खेळत हि गाणी /लोकगीतं तालासुरात गातात.त्यानंतर खिरापत (प्रसाद ) हा डब्यात लपवला जातो विशेष म्हणजे तो डबा लहान मुलांपुढं वाजवला जातो आणि त्याच्या आवाजावरून मुलांनी तो ओळखायचा असतो (हा खेळ लहान मुलांसाठी गंमत म्हणून खेळला जातो). मुलांनी जाणीवपूर्वक खिरापतीसाठी गाणं म्हणावं हे अपेक्षित असतं. त्यावेळी शेवटच्या ओळी मुलं आवर्जून गातात.
भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलांना आनंद झाला,
पावर्ती म्हणे शंकराला;
चला हो माझ्या माहेराला .....
गेल्या बरोबर पाट बसविला,
विनंती केली यशोदेला,टिपऱ्या खेळू,
गाणी गाऊ, प्रसाद घेऊ घरी जाऊ ......
''बाणा बाई बाणा सुरेख बाणा
गाणी संपली खिरापत आणा "
लहानपणी आमचा सगळा डोळा हा खिरापतीवर असायचा आणि तो ओळखणं म्हणजे जणू वर्गात पहिला नंबर आणण्यासारखं वाटायचं .... खूप कौतुक व्हायचं किती खिरापत खाऊ आणि नको असं व्हायंच..... फार आनंद मिळायचा त्यातून.... बोबडे बोबडे बोल, आपल्याच मनाने यमक जुळवत काही गाणी लांबवत जाणे .... आणि ज्यांच्या घरात खिरापत काही विशेष नसेल त्यांच्याकडे मात्र एक दोन गाणी गाऊन लगेच खिरापतीच्या गाण्यावर डायरेक्ट गाडी वळवायची (अर्थातच ज्यांना हि गाणी पूर्ण यायची त्यांच्या इशाऱ्यानुसार गाण्यांचा शॉर्टकट घेतला जाई).
माझ्या आजी आणि आईमुळे भुलाबाईची गाणी आम्हा सगळ्या मुलांना तोंडपाठ आहेत. सासू -सून, सासरे- दीर, सासर- माहेर यावर थट्टा मस्करी करणारी ही गाणी असतात .... हा सण खरं तर छोट्या मुलांमुलींचा पण आम्ही भावंडं बाहेरगावी गेल्यावर आईने तो सुरूच ठेवला शेजारच्या छोट्या मुलांना आनंद घेता यावा, अशाप्रकारच्या सणांची, परंपराची माहिती असावी म्हणूनच...
काल तब्ब्ल १० वर्षांनी आम्ही भुलाबाईला लहापणी जसं बसवायचो तसं बसवलं ... खिरापतही केला होता. विशेष म्हणजे आमच्या नकळत आईने तो डब्ब्यात देखील लपवला होता. पण आता आम्ही नुसत्या पदार्थाच्या वासावरून खिरापत ओळखण्या इतपत हुशारर्रर्रर्रर्रर्र झालोय असं आई म्हणते
भुलाबाईंची भरपूर गाणी तर भरपूर आहेत पण गाणी कशी असायची याचं एक उदाहरण ...
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येणार कैसी?
सासू गेली समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला....
मी नाही यायची तुमच्या घराला
माझा पाटल्यांचा जोड देते तुजला
तुमचा पाटल्यांचा जोड नकोय मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी?
सासरे गेले समजावयालाचला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
घोडागाडी देतो तुजला
घोडागाडी नकोय मजला
मी नाही यायची तुमच्या घराला.....
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी?
सासूरवाशीण सून घरात येना कैसी?
पती गेले समजावयालाचला चला राणीसाहेब
अपुल्या घरालामाझा लाल चाबूक देतो तुम्हाला
तुमचा लाल चाबूक हवाय मजला
मी तर यायची अपुल्या घराला
यादवरा या राणी घरात आली कैसी.......
( नणंद, दीर सगळे सूनबाईला समजवायला जातात आणि गाणी हवी तशी अतिशोयक्ती करून लांबवली जातात.... )
--© स्नेहल बाळापुरे
Comments
Post a Comment