पिहू ही माझी मैत्रीण ...

आमची मैत्री अमरावतीच्या कॉलेजपासून सुरु झाली...
पुढच्या शिक्षणासाठी आम्ही गाव सोडलं ....
नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहायला गेलो .... त्यामुळे तिची नि माझी ताटातूट झाली.... जेव्हा कधी गावी गेले तर ती एखादवेळ घरी यायची ... नाही तर फोन - मेसेजवर बोलणं व्हायचं तेही खूप नाही तीन चार सहा महिन्यातून कधीतरी ... पण आमच्या मैत्रीत कधी अबोला झाला नाही .... कॉल मेसेज केले नाहीत म्हणून कधी भांडण झाले नाहीत .... ज्याला आठवण झाली तो विचारपूस करायला आवर्जून कॉल करणार .... एवढंच
साधारण आठ-नऊ महिन्यापूर्वी पिहूच लग्न जुळलं. तिचं लग्न माझ्या आधी होणं साहजिकचं होतं, कारण आम्ही एका वर्गात असलो तरी ती वयाने तीन चार वर्षाने मोठीच होती. ती एक दुसरी डिग्री पूर्ण करून आमच्या कॉलेजमध्ये शिकायला आली होती. वर्गात मोजक्याच लोकांशी ती बोलायची त्यामुळे आमच्या वर्गात आम्ही तिच्या ५/६ मित्र मैत्रिणी असू ....
तिच्या लग्न जुळल्याचे आणि साखरपुड्याचे फोटोस तिने आम्हा मित्रमैत्रिणींना पाठवलेत.... पण मित्रपरिवारातल्या कुणालाही आग्रहाचं निमंत्रण नव्हतं.... आम्ही सगळे वेगवेगळ्या शहरात आहोत म्हणून ही कदाचित आम्हाला येण्याचा आग्रह नव्हता.... फोटोवरून तरी दिसलं की, साखरपुडा घरातल्या घरात पण खूप थाटामाटात झालाय.
पिहूचा साखरपुडा झाल्यावर १०/१२ दिवसांनी मी कॉल केला... आमचं नॉर्मल बोलणं होतं .... मुलगा काय करतो ?कुठे राहतो ....थोडी लग्नाला घेऊन मजा मस्ती ..... जरा जास्तीची चेष्टा ... तिने सांगितलं लग्न आताच आहे २ महिन्याने... आम्ही तयारीला लागलोय ... लग्नाचे कार्ड आले की घरी पाठवते ... अर्धा पाऊण तास बोलताना मी तिला विचारलं , खुश आहेस ना ?
ती म्हणाली होय .... पण माहित नाही थोडं घाबरायला होतय .... सहाजिक नवीन नवीन आहे तर होत असेल .... ह्म्म्म मुलाची नीट चौकशी केली आहेस ना ?
ती -- होय .... अरेंज मॅरेज आहे ... नातेवाइकांनी सुचवलंय स्थळ ... सगळं नीट वाटतंय सध्या तरी ...
मी -- तुला आवडला ना मुलगा .... मग बाकी गोष्टी होतात मॅनेज.
ती -- होप सो .... विष मी लक .... !!!एवढं बोलून टाटा बाय बाय झालं ....
ती तिच्या लग्नकार्यात गुंतली ...
लग्नाच्या आधी पिहू आणि तिचा होणारा नवरा लग्न खरेदीला गेले , ते दोघे हॉटेलमध्ये जेवयाला गेल्याचे फोटोसही तिनं स्टेटस ठेवल्याचे दिसले ...एकंदरीत बरं चाललंय असं जाणवलं .... या दरम्यान आमचं काहीच बोलणं झालं नाही .....
मार्चमध्ये लोकडाऊन लागलं .... सगळीकडे एक विचित्र परिस्थिती होती .... माझ्याघरी माझ्याही भावाच्या लग्नाची गडबड सुरु झाली .... तेवढ्यात मी आईला विचारलं पिहूच्या लग्नाची पत्रिका आली का ? नाहीतर तिचं आणि आपल्या घरचं लग्न एकाच दिवशी यायचं .... आई - अग लोकडाऊन आहे ... मोजके लोकं असतील ... कुठं मित्रमैत्रिणी बोलवणार ? आपल्यालाही नाही बोलवता येणार .... तूही फोनवरच शुभेच्छा दे!आईच बोलणं झालं.... ती बरोबर बोलली .... पण तरी पिहू नाही बोलवू शकत ठीकय पण सांगू तर शकतेच ! (स्वतःशी बोलत ) का कुणास ठाऊक ..... असो म्हणून थोडक्यात थातुर मातुर बोलून गेली ...
या दरम्यान तीन चार महिने गेले ..... आमच्या घरंच लग्न झाल्यावर मी पिहूला कॉल केला.... घरच्या लग्नाविषयी सांगायला आणि तिला जाब विचारायला
मी .... बेटा शादीका कार्ड नाही दिये ठीक है .... बताना तो चाहिये कब किये हो शादी?.... !
पिहू --- ओह्ह क्या है ना जरुरत नही पडी !....
मी --- हाहाहाहा !!! लोकडाऊनमुळे खर्च वाचला तुझा ...
ती --- होय जरा जास्तच खर्च वाचला !!
खर्च सोड पण नुकसान झालं ......... !
मी -- काही झालंय का ? कुणाचं नुकसान ?
पुढं ढकलंय का लग्न ?
ती -- छे नाही ग ......... लग्नच नाही होणार .....
मी -- भेटून बोलायचं का ? काय झालंय सांग ना तुला
ती -- नाही माझं घर कोरंटीन आहे .... शक्य नाही नंतर बोलू ....
मी -- ठीकय .... तुला वाटेल तेव्हा कॉल कर .... मी घरीच आहे ...
हे उलटून एक सव्वा महिना झाला .... पिहूचा कॉल आला ... नॉर्मल बोलण्याची सुरवात झाली .... हळूच ती बोलती झाली ... माझं लग्न मोडलंय ....
मी -- का मोडलंय ? काय झालंय ?
ती -- तू खूप हसशील अशा कारणामुळं मोडलंय ?
मी -- बोल पटपट .... नाही हसणार मी ..... वाईट झालंय ... सांग ग लवकर
ती -- मुलाकडचे म्हणतात मला स्वयंपाक नाही येत .... आणि मी उशिरा उठते .... हाहाहाहा
मी -- झालं तुझं मजाक करून ? खरं बोल आता .... असं कारण देऊन का कुणी लग्न मोडेल ?
तुझ्या हातचा स्वयंपाक आम्ही सगळ्यांनी कॉलेजमध्ये खाल्लंय... चांगलं करतेस तू... आणि राहिली गोष्ट उठण्याची तर आपण कॉलेजमध्ये असतांना मध्यरात्री - पहाटे पर्यंत असाइनमेंट करत बसायचो... आणि सबमिशनला सकाळी ९ वाजता हजर राहायचो.... काही काय बोलतेस बावळट.... तर झोप हि गोष्ट आपण खूप मॅनेज केलीय .... साला काय फालतू ....
ती -- पण हे खरंच आहे.... मुलाच्या घरच्यांनी माझ्या घरी फोन करून लग्न हा विषय या कारणांनी संपवतोय हे कळवलं...
मी -- मुलाशी बोललीस का ? तो काय म्हणतोय....
तिने सांगितलं तो चांगला बोलतो ... अगदी शांतपणे ... तिने चिडून लग्न तोडण्याची हि कारण का दिली असं विचारलं तर तो फक्त 'लग्न नाही होणार .... सोडून देऊ या बाकी गोष्टी.. असंच म्हणतोय .... ती त्याला म्हणाली "तू खूप लठ्ठ आहेस .... फार गर्भ श्रीमंतही नाहीस.... तुला काही आजार असतील तर तेही सांग .... आपण दोघे मॅनेज करू या ... लग्न झाल्यावर तुला काही आजार झाले तर सोडून नसतं दिलं ... सांभाळलं असतं... विचार कर एकदा लग्न नको तोडूस .... साखरपुडा होण्याआधी सांगायचं असतं ना ? आता लग्न मोडून माझी बदनामी होईल .....तो फक्त तू शांत हो पिहू ... एवढंच म्हणाला ... दुसरी कुठलीही खोटं काढायला कारण नव्हती...त्या दोघांचा हा शेवटचा संवाद होता.
लग्न मोडलं पण लग्न विषय संपला नाही .... लग्न मोडून पाच महिने झालेत ... सगळे आजूबाजूचे पिहूला विचारतात .... लग्न विषयावरून चिमटे काढतात .... लग्न मोडलं म्हणजे तिच्यात कमी आहे का ?असे विचारणारे फोन कॉल्स येतात... बॉयफ्रेंड तर नाही ना ? तुझं अफेअर तर नाही ना ? असं मुद्दाम खोचटपणे विचारून त्रास देतात... खरी कारण तर वेगळीच होती ... जी शोधाशोध केल्यानंतर बाहेर आली... प्रॉब्लेम मुलामध्ये आहे त्याचं पितळ उघडं करण्याऐवजी तिलाच टोमणे ऐकवणं सुरु होतं.



मुलगा अतिशय लठ्ठ होता पण दिसायला बरा होता ... पिहू बघायला नीटनेटकी आहे, मध्यम बांध्याची आहे... दोघांनी एकमेकांना पसंती दिली होती तेही दोघांच्या घरच्यांपुढे .... तिने त्याच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करून बाकी सगळं नीट आहे हा विचार करूनच होकार दिला... म्हणून तर साखरपूडा झाला... पण साखरपुडा झाल्यावर आणि लग्नाची तारीख निघाल्यावर मुलाला काही दिवसाने दवाखान्यात ऍडमिट केल्या गेलं ... जे पिहूच्या घरी कुणीच कळवलं नाही... मुलायाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे हे कित्येक वर्षांपासून त्याच्या कुटुंबाला आणि त्याला माहित होत .... तो दहा पायऱ्या चढल्या की थकतो हे हि त्यांना माहित होतं.... तो कुठलंही धावपळीचं किंवा मेहनतीचं काम करू शकत नाही त्याच्या हृदयाला क्षीद्र असल्याचं खूप आधीच निदान लागलं होतं .... हे सगळंच्या सगळं मुलींच्या घरच्यांपासून लपवलेलं गेलं ...लग्न मोडल्यानंतर हे सगळं आता पिहूच्या घरच्यांपर्यंत पोहोचलंय ...
आता वाचून म्हणाल, बरंच झालं लग्न मोडलं.... पण पिहूला जोपर्यंत मुलाकडून लग्न मोडण्याची योग्य ती कारण कळत नव्हती तोपर्यंत ती स्वतःला दोष देत होती ....लग्न मोडण्याची उत्तर येता जाता तिला विचारली जातेय शिवाय नवीन स्थळ घरी यायला साहजिकच त्रास होतोय .... किती लोकांना आणि काय -काय सांगणार ?.... सांगितलं तरी विश्वास बसणार? होणाऱ्या मानसिक त्रासाची भरपाई कोण नि किती करणार ? साखरपुडा ते लग्न या अल्पश्या कालावधीत खूप स्वप्न रंगवली जातात....मोडलं पण संपलं नाही याची जाणीव खोलवर झालेली असते अन त्याचा त्रास वेगळा असतो.
---स्नेहल

Comments

  1. Apratim likhan..
    Aani lagna modnya che prasang aaj kal sarras kanavar padtat..

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyawad ...
      hoy na khupch mansikta vegali hot jate ahe lokanchi.

      Delete
    2. Khup chan lihilas snehal tai😘

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog