'सेक्स वर्कर', 'काँडम टीचर' आणि बरंच ....


नोकरीसाठी बँगलोरआल्यानंतर माझ्या बोलण्यातून वाचनाची आवड बघून माझ्या कलिगने काही इंग्रजी पुस्तकं मला वाचायला दिली. त्यात काही ब्रॅंडिंग, पॅकेजिंग होती तर काही फिलॉसॉफी. मात्र ही सगळीच इंग्रजीत होती. एकंदरीत माझा इंग्रजी वाचनाकडे कल तसाही कमीच होता. त्यामुळे हो वाचू वाचू म्हणून टाळत गेले. पण या लोकडाऊनमुळे सुट्टीचा सदुपयोग म्हणून हातात घेतले, तर त्यात मला एक अतिशय वेगळ्या विषयाचं पुस्तकं हाती आलं.
"The Autobiography of a Sex worker" Writer 'Nalini Jameela'.

पिवळ्या रंगावर काळ्या रंगाचं एक छोटंसं मोजक्या रेषांचा वापर करून केलेलं इल्लस्ट्रेशन आणि त्याच रफ पण हॅन्डरायटिंग स्टाईलनं लिहिलेलं पुस्तकाचं टायटल फार आकर्षक आहे . हा विषय आणि मुखपृष्ठ (कव्हर ) दोन्ही फार टेम्टिंग वाटलं मला. कारण, आतापर्यंत एखादा नट- नटी, दिग्दर्शक, शास्त्रज्ञ, कवी, कलाकार, खेळाडू हे आपले आत्मकथन लिहितात हे मला माहित होतं. कॉलेजमध्ये असतांना स्टीव्ह जॉब, सचिन तेंडुलकर, रीशी कपूर अशा काही दिग्गजांची बायोग्राफी वाचण्यात आली. शिवाय बायोग्राफी बेस सिनेमांचं ट्रेंड ही आहे त्यामुळे असे सिनेमेही पाहिलेत पण एक सेक्सवर्कर अन ती बायोग्राफी लिहिते !!! फारच आश्चर्य आणि कौतुक वाटलं.

सगळं बाजूला सारून हे पुस्तकं वाचायला घेतलं. बरेचदा असं होतं की, एकदा वाचनाची लिंक लागते आणि अचानक काही काम येतं आपण ते मध्यावर सोडतो आणि राहिलं तिथून पुढं वाचायला सुरु करतो. पण माझं मात्र हे पुस्तकं वाचतांना असं झालं नाही याला कारण जशी जशी मी पुढं जात गेले तिला आणखीन समजून घ्यायला वाचून झालेल्या पानांवर परत परत जावं लागलं. 'नलिनी जमीला' यांनी हे मूळ पुस्तकं त्यांच्या मल्याळी भाषेत लिहिलं आहे आणि त्याच इंग्रजी भाषांतर 'जे. देविका' यांनी केलं आहे.

बरेच मल्याळी शब्द जसेच्या तसेच यात ठेवले आहेत त्यामुळं वाचायला एक वेगळी गंमत वाटली. साहजिकच अर्थ समजून घ्यायला वेळ लागला कारण ती भाषा माझ्या परिचयाची नाही. हे पुस्तकं वाचतांना असं लक्षात आलं की यात बऱ्याच चुका आहेत. असोत ... त्या चुकांकडे दुर्लक्ष करू या. दोन वर्ष पब्लिकेशन सोबत काम करून आलेले ते गुण ( काहींसाठी दुर्गुण) !!!

हे पुस्तकं लिहायला मुळात हिंमत हवी, जी लेखिकेनी दाखवली आहे. सेक्स वर्कर म्हणून काम सुरु केल्यानंतर पहिला क्लायंट कोण इथंपासून संसार, मुलगी, लग्न, जात-धर्म शेवटी माणुसकी आणि जगणायची जिद्द अशा विषयांना स्पर्श करत हे आत्मकथन लेखिकेच्या 'पुस्तक लिहावंसं का वाटलं' या मुलाखतीवर येऊन संपत. 'सेक्स वर्कर' ते 'काँडम टीचर' पर्यंतचा हा साहसी प्रवास तिथंच थांबला नाही.
नलिनी जमीला यांनी २००१ साली बायोग्राफी लिहिण्याचा विचार केला आणि २००५ साली पुस्तकं पब्लिश झालं. आता २०२० सुरु आहे म्हणजे नक्कीच

२० वर्षांपूर्वी असे विषय लिहून मांडायला कसरत झाली असेल.
सेक्स वर्कर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सिनेमात पाहिलं तसं किंवा प्रत्यक्षात आजूबाजूला डोकावून बघितल्यानंतर जी सर्वसाधारण इमेज तयार होते ती अशी असते "अरे बिचारी " !!!! हे काम करावं लागतं ? फक्त पैशासाठी.... किंवा छा$$$$ याssss असल्या बाया ........ !!!!! आणि आपली मान - नजर वळवून घेणं.... बरेचदा त्यांना बघून एक तर लोंकाना घृणा येते किंवा काहींना कीव येते.... ! पण त्यांच्याविषयी अभिमान वाटावा असे किती ?

या पुस्तकात जमीला यांनी कुठेही स्वतःसाठी "लाचार- बिचारी", सहानुभूती जाणीवपूर्वक मागून घेणारे किंवा अत्याचार झाल्याचे कुठलेही पाढे ओढून ताणून लिहिलेले नाहीत. मुख्य म्हणजे 'वेश्या' व्यवसायात उतरल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट अनुभवाला ती आनंदाने कशी जगली ? आणि या "सेक्स वर्कर" म्हणून लागलेल्या टॅगचा तिला कसा अभिमान आहे हेच लिखाणातून पुढं येतं. साहजिकच वाचता वाचता वाचकाच्या मनात देखील त्यांच्याविषयी अभिमान वाटायला लागतो. एक सेक्स वर्कर म्हणून जुना काळ आणि आताच काळ याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि अनुभव देखील यात मांडला आहे. शिवाय सेक्स वर्कर आणि एका मुलीची 'आई' हे "आईपण" कशी उम्मेद देतं, ताकद म्हणून उभं राहतं याचे अनुभव नक्कीच वाचण्याजोगे आहे.

----- स्नेहल बाळापुरे

पुस्तक वाचून प्रत्येकाचे आपले विचार आणि मत तयार होत जातात...
हे पुस्तक वाचून तुम्हालाही सांगावसं वाटलं. तुमच्याकडेही काही वेगळी पुस्तकं असतील तर मला नक्की कॉमेन्ट करा, मेसेज करून सांगा

Comments

  1. Tumchya broad aani exceptional view mule a must read...will keep U posted...:)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog