'झी'वर गाजला कलाविद्यार्थ्यांचा आल्बम!


सध्याच्या काळातला कोरोनाचा कहर आणि हा लोकडाऊन बघता चित्रकलेपासून ते नाट्यकलेपर्यंत सगळीकडेच मंदी आलेली आहे. पण याच कठीण काळात काही कलाकारांनी आपल्या कलागुणांमुळे नावलौकिक मिळवलेला आहे, त्यामध्ये नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचं नावं प्रामुख्यानं सामोरं येतंय.




'कुंभाराचा गणपती' हा एक मार्मिक सत्य मांडणारा म्युसिकअल्बम कला विद्यार्थांनी तयार करून एक आदर्श नव्या विद्यार्थ्यांपुढं मांडलाय. त्यांच्या कामाचं कौतुक आज जगभरातून होतंय. त्यांचा हा कुंभारासारख्या कलाकाराच्या वास्तविक जीवनावर प्रकाश टाकणारा आणि त्याचबरोबर एक सामाजिक संदेश देणारा म्युसिकअल्बम 'ZEE Music' द्वारे नुकताच प्रदर्शित केल्या गेला. गेल्या काही तासातच त्यांना ११ मिलियन्सपेक्षा जास्त प्रेक्षक लाभला आहे.


नागपूरच्या कुंभारवाडीत या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. धो-धो कोसळणारा पाऊस, त्यात कोविड-१९ चे नियम, शिवाय अनेक तांत्रिक अडचणी सांभाळून या गाण्याचं चित्रीकरण अवघ्या एका आठवड्यात पूर्ण करून ते झीकडे सुपूर्द करण्यात आलं होतं. म्हणूनच गाण्याच्या शीर्षकाला साजेसा मुहूर्त त्यांना देखील गाठता आला. बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावरच 'ZEE Music' ने हे गाणं प्रसारमाध्यमांवर प्रकाशित केलं आणि ते प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरलं.


'कुंभाराचा गणपती' या गाण्याच्या शीर्षकावरूनच कुंभारासंबंधित ही कथा असेल याचा अंदाज प्रेक्षकांना येतो पण संपूर्ण गाणं बघितल्यानंतरच एकूण कथेचा अर्थ आणि गाण्याचा आशय उमगत जातो. या गाण्याची खासियत म्हणजे एका कुंभाराच्या आयुष्यात येणारा 'गणपती उत्सव' आणि सामान्य जनतेकडे उत्सव म्हणून बसवला जाणारा गणपती(मूर्ती) यातील फरक आपल्याला प्रकर्षानं जाणवतो. नृत्य, संगीत आणि गाण्यातील एकूण एक बोल याला लेखकांनी,गायकांनी, संगीत दिग्दर्शकाने जसा न्याय दिलाय तसाच गाण्यातील प्रत्येक नटाने, पात्राने दिलाय. फक्त चार साडेचार मिनिटांच्या या गाण्यात प्रेक्षकं नक्कीच अंतर्मुख होतात आणि याचं संपूर्ण श्रेय यशस्वीपणे एकत्र काम करणाऱ्या टीमला जातं.


या गाण्याचा कॉन्सेप्ट 'सुबोध आनंद' याचा असून 'राकेश पाठराबे' याने कलादिग्दर्शक म्हणून तर अभिलाष विश्वकर्मा याने DOP म्हणून काम सांभाळलंय.
सुबोध आनंद हा अत्यंत उत्कृष्ट नट नि भावनिक चित्रकार आहे. त्यानं नुकतंच दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे त्याचे नुकतंच रिलीज 'कुंभाराचा गणपती' तर काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'आठवणींची सावली' अशा दोन्ही गाण्याला Zee musicनेच प्रकाशित केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यानं एक चांगली कामगिरी केल्याचं या दोन्ही गाण्यातून दिसतं.सुबोध सांगतो, 'कुंभारकाम' याविषयवावर तो बऱ्याच दिवपासून अभ्यास आणि लिखाण करतोय. त्याला एक तीन तासाचा सिनेमा तयार करायचा तत्पूर्वी एक प्रयोग म्हणून यानं हे गाणं फिल्मरूपात मांडलं. ज्याचं चित्रीकरण अगदी चित्रपटासारखं आहे पण संपूर्ण कथानकं गाण्यातून साकारलं आहे. शिवाय त्याचा हा अनोखा प्रयोग आज लाखो लोकांच्या पसंतीस उतरलेला आहे.


राकेश पाठराबे हा चित्रकारा व्यतिरिक्त एक चांगला मूर्तिकार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणात वापरण्यात आलेल्या सगळ्या गणेशमूर्ती राकेशने स्वतः तयार केलेल्या आहेत. राकेशने याआधी नागराज मंजुळे यांच्या 'झुंज' (प्रदर्शित न झालेला/केलेला ) चित्रपटासाठी असिस्टंटआर्टडायरेक्टर (कलादिग्दर्शक) म्हणून काम केलं होतं पण व्यावसायिक कलादिग्दर्शक म्हणून काम करण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. अभिलाष हा अप्लाइड आर्टमध्ये फोटोग्राफीचं शिक्षण नुकतंच पूर्ण करून करियरला सुरुवात करणारा विद्यार्थी होता. राकेश आणि सुबोधशी त्याची कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला मैत्री झाली. सुबोधच्या चर्चेतून त्याला एकत्र काम करण्याची संधी मिळाली याशिवाय बरिच मराठी गाणी आणि लघुपटावर त्यानं DOP म्हणून स्वतंत्रपणे काम केलंय. राकेशबरोबर सचिन कुंभारे यानेदेखील कलादिग्दर्शक म्हणून काम केलंय. या सगळ्यांनी आजपर्यंत जी गाणी आणि पॉकेटफिल्म्स केल्यात त्या नागपूरमध्येच केल्यात यामागे उद्देश एवढाच की, त्यांना आपल्या कामाची ओळख आपल्या गावातूनच दाखवायची होती.


कुंभाराचा गणपती या गाण्याच्या कथेतील प्रमुख नट 'मुकुंद वसुले' आहेत ज्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांवर सोडली आहे. सागर कानेर यांनी गीतलेखन केले असून ऋषिकेश करमरकर हे गायक म्हणून तर मोहीत मनुजा यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. याव्यतिरीक्त रुद्रप्रतापसिंग ठाकूर, संग्रामसिंग ठाकूर, आकाश तायडे, कल्पना तेलंग, नितीन मरसकोले आणि मंजिरी कावळे इत्यादी कलाकारांनी काम केले आहे. एका कलाकाराचं भावनिक सत्य हळुवार उलघडत नेणारा त्यातूनच योग्य तो संदेश लोकांना देणारा नव्या कलाकारांनी केलेला म्युसिकअल्बम अवश्य बघा.


----स्नेहल बाळापूरे

      (सदर लेख 'चिन्ह'द्वारे प्रकाशित)

Comments

Popular posts from this blog