'त्याला' मोदक आणि 'तिला'.....?



काय विरोधाभास आहे ना आपल्याकडे...!
देव्हाऱ्यात बसलेल्या त्या मूर्तीला पंचपक्वान्न फारंच सोपस्कारात दिले जातात आणि पशूप्राण्यांना कुठलाही विचार न करता, कसलीही शहानिशा न करता काहीही आपण खायला घालतो ?

असला प्रकार फक्त केरळमध्येच नाही तर जिथं जिथं हा मनुष्य नावाचा असंवेदनशील प्राणी राहतो तिथं तिथं बघायला मिळेलंच. काय म्हणून अगदी सकाळ संध्याकाळ न चुकता शुचिर्भूत होऊन चांगले चांगले पदार्थ देवापुढं ठेवतो ? खरंच सांगा मंदिरातले किंवा घरातील देव खातात का हे सगळं? शेवटी ते शिळं झालं की बाहेर गाई म्हशी नाहीतर कुत्र्यांसमोर घातलं जातं....

मी जरी पूजापोथी करत नसले तरी पूजाअर्चा करण्याला, नैवेद्य दाखवायला माझा विरोध नाही....निसर्गातल्या दृष्टीस न पडणाऱ्या पण सतत जाणवत असणाऱ्या त्या दिव्य शक्तीवर माझा विश्वास आहे. माणुसकीचे धडे कुणालाही देण्याआधी आपणच आपल्या घरात डोकावून बघितलं तर सत्य पुढं येईल.

गाभाऱ्यात बसलेल्या त्या मूर्तींना चमचमीत पदार्थ आणि निष्पाप, मुक्या प्राण्यांना कधी टाचण्या, खिळे घातलेलं अन्नतर कधी फटाके घातलेले फळं !!!!
मंदिरातल्या निर्जीव मूर्तीला चांदीचं ताट, सोन्याचा चमचा ( जे ते कधीच मागत नाही ) आणि या प्राण्यांसाठी उकिरड्यावर उरलं सुरलं 'प्लॅस्टिक'च्या पिशवीतून फेकल्या जातं... ! सगळीकडे हीच परिस्थिती दिसेल. कित्येकदा प्राण्यांना त्या प्लॅस्टीच्या गाठी सुटत नाहीत म्हणून संपूर्ण गिळतांना बघायला मिळतं पण अजूनही आपलं प्लास्टिक पुराण काही कमी झालेलं नाही शिवाय काही ठिकाणी प्राण्यांसाठी प्यायला ठेवलेलं पाणी डबक्यापेक्षाही वाईट असतं ! मग इथं नाही काय आपली माणुसकी हरवत ? नाही का जावीवपूर्वक बेजवाबदार होत ?

केरळमध्ये जे घडलं ते अत्यंत वाईट आणि वेदनादायी आहेच पण या प्रकरणावरून लगेच शाब्दिक राजकारण सुरु झालं !! "केरळ १००% साक्षर आणि माणुसकी ०% !!" अशा नानाविध कमेंट्स कालपासून बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळताहेत ...अहो पण आपण हे लिहिणारे देखील साक्षरचं ना !!!

केरळमधलं हे क्रूर प्रकरण जगासमोर उघडपणे मांडलं गेलं म्हणून तर बोलणारी लाखो तोंड आज व्यक्त होतांना दिसतायेत (यावरही माझा कुठला आक्षेप नाही, सगळ्यांना विचार आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहेच).
कुत्र्यांच्या शेपटीला फटाके लावणं, प्राण्यांवर गरम पाणी फेकणं असे अनेक विचित्र प्रकार तुम्हाला वाचायला किंवा बघायला मिळेल.

पण जरा आजूबाजूला डोळस होऊन बघितलं तर आपल्याला कळेल गेल्या ३-४ महिन्यापासून धुडगूस घालणाऱ्या या 'कोरोना'मुळे लॉकडाऊनच्या काळात व्हायरसच्या भीतीपोटी कितीतरी चांगल्या महागड्या जातींच्या कुत्र्या, मांजरांना लोकांनी रस्त्यांवर सोडून दिलं आहे आणि मुख्य म्हणजे हे महाराष्ट्रात झालंय शिवाय जगभरात बऱ्याच ठिकाणी देखील असं घडल्याचं चित्रं आहे. मग तेव्हा कुठं गेली साक्षरता अन माणुसकी ? प्रसंग कुठलाही असू देत लगेच त्या राज्याला, शहराला किंवा गावाला नावंबोटं ठेण्यात नेहमीचं पुढं होतो अशावेळी मात्र आपण मूर्खपणाचा कळस गाठतो !!!

तसंही प्राण्यांच्या घरांना मोडून तोडून अन उध्वस्त करून आपण घरं उभारली आहेत .... हेही विसरायला नकोच !आज जगभरात सुरु असणारं #कोरोना (नैसर्गिक प्रकरण आणि कालपासून थैमान घालणारं हे #'निसर्ग' वादळ या नैसर्गिक शक्तींनी अजूनही आपलं रौद्र रूप धारण केलेलं नाही तिच्या फक्त ट्रेलरनं आपली ही परिस्थिती आहे.

विचार करा ज्या दिवशी ती 'तांडव' करायला सुरुवात करेल तेव्हा आपल्याला पळता भुई थोडी पडेल हे काही वेगळं सांगायला नको. काल आलेल्या वादळात एवढी जुनी, जाडजुड मोठ्या बांध्याची अनेक झाडं ठीक ठिकाणी पडल्याची दृश्य आपण मीडियावर पाहिलीत.... अहो झाडांना पण जीव असतो हो ... !!!!! ती जीवित हानी नाही का? लोकं म्हणाले एकही जीवित हानी नाही !!!! वावा !!! इतके तर आपण मनुष्य कित्येक ठिकाणी भावनाहीन होत जातोय .... आणि काय म्हणून माणुसकीवर भाष्य करतोय ?

शेवटी एवढंच सांगणं (मागणं) की आता तरी वेळ जाण्याआधी निसर्गाबाबतीत संवेदनशील होवूया ....

हे लिखाण संपवतांना ग. दि. माडगूळकरांच्या काही ओळी आठवल्या...
"इथे फुलांना मरण जन्मता,
दगडांना पण चिरंजिवीता
बोरी बाभळी उगाच जगती,
चंदन माथी कुठार"
अजब तुझे सरकार .... उद्धवा...

✍️© स्नेहल बाळापुरे
चित्रं -- ©निलेश जाधव

Comments

  1. परखड आणि वास्तवादी लिखाण केले आहे, खरंच दुसऱ्याला उपदेश देण्याआधी स्वतः करत असलेल्या कृतीचा विचार करणे अनिवार्य आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद हर्षल !! 
      माझ्या मताशी सहमत असल्याबद्दल ... 

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog