पटनासे आया एक खत...


सायकलनं भारतभर 'कलाप्रवास' करण्याची 'प्रतिक'ची ही भन्नाट कल्पना ऐकूनच त्याची पहिली मुलाखत मी 'चिन्ह' साठी घेतली होती. ही मुलाखत सोशल मीडियावर बरीच गाजली. हा प्रवास सुरु करतांना अनेक अडचणी आल्यात. प्रतिकच्या कलाप्रवास सुरु करण्याच्या तारखा सतत बदलत होत्या. त्याला पावसानं यावर्षी घातलेला गोंधळ ही बऱ्याच अंशी कारणीभूत होता. ठरवलेल्या रस्त्यांवर इतका बेधुम पाऊस होता की, रस्ते देखील बेपत्ता झाले होते. शिवाय अनेक तांत्रिक अडचणी सोबतीला होत्याच.




प्रवास सुरु करण्याधीपासून प्रवासात काय करावं ? काय नको ? कसं डॉक्युमेंटेशन करावं किंवा व्हावं यावर अधून मधून प्रतीक आणि माझी चर्चा सुरु असायची. हा काही थोडा थोडका प्रवास नव्हता तब्बल एक वर्ष ४ महिने त्याची भ्रमंती चालणार आहे. या प्रवासात स्वतःच मनोबल कसं वाढवत राहावं यावर बोलणं सुरु असतांनाच एकदा त्यानं सांगितलं की, 'तो या कलाप्रवासात सहभागी सगळ्यांना प्रवास सुरु झाला की तो जिथं कुठं असेल तिथनं पत्र लिहिल'.

त्याची ही कल्पना छानच होती पण मला वाटलं कसं शक्य होईल याला ? एवढी सायकल घेऊन एकटा प्रवास करणार ...., पुढच्या मिनिटाला रस्त्यात काय वाढून ठेवलं असणार आहे त्याला देखील माहित नाही .... म्हणजे जेवयाला मिळेल की नाही ? राहायला जागा मिळेल की नाही ? वाट चुकली तर .... असे नाना प्रश्न मी माझ्याच मनात ठेवले पण तेव्हा मात्र मी त्याची बाजू राखण्यासाठी त्यावर कुठलेही उलट - सुलट प्रश्न न विचारता त्याच्या या सुपीक कल्पनेचं मनापासून कौतुकच केलं.

आज प्रतिकचा कलाप्रवास सुरु होऊन सहा महिने पूर्ण झालेत. आणि मला मुंबई सोडून पाच महिने... पण पटनाहून पाठवलेलं त्याचं पत्र मला आज नवीन शहरात पोस्टानं आलं. पत्र बघून खूप आनंद झाला आणि त्याहीपेक्षा त्यानं या प्रवासात ठरवल्याप्रमाणं सगळयांना आठवणीनं वेळ मिळेल तसं तो जिथं असेल तिथून पत्र पाठवण्याचं काम निष्ठापूर्वक करतोय.

पत्र लिहिण्यामागे त्याचा एक जाणीवपूर्वक उद्देश आहे, तो म्हणजे सोशल मीडियाच्या काळात आपण किती टेकनॉलॉजिचे अधीन झाले असू तरी पत्र पाठवण्याचा आनंद वेगळा आहे. आता पूर्वीसारखं कुणी कुणाला पत्र लिहीत नाही. म्हणूनच प्रतिकनं हेतुपूर्वक हे करायचं ठरवलं. एफोर साईझच्या पेपरवर त्याच्या प्रवासातल्या काही आठवणी आणि सुरेख स्केच केलेलं पत्र मला मिळालं आहे. पत्र वाचून खूप आनंद झाला. प्रतिकच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा ....

---- स्नेहल बाळापुरे

Comments

  1. Really great! In this changing era we should not forget our old principles. Remember Old is Gold forever!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks... ya I am agree with you "Old is gold' always...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog