सायकलवरून भारत भ्रमण ...
"पंख असणाऱ्यांना क्षितिजाची तमा नसते... " असं म्हणतात. ते खरंच आहे. 'प्रतीक जाधव' या बीडमधील वडवणीसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या ध्येयवेड्या तरुण कलाकाराची ही कहाणी
ऐकल्यानंतर या वाक्याची साक्ष नक्कीच पटेल.
ऐकल्यानंतर या वाक्याची साक्ष नक्कीच पटेल.
'प्रतीक जाधव' जेजे स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागातील अंतिम वर्ष पूर्ण करून कलाक्षेत्रात आपले पाय रोवण्यासाठी धडपड करणारा एक विद्यार्थी आहे. प्रतीकनं शिल्पकलेत अनेक पारितोषिकं मिळवलीत. राज्य कला प्रदर्शनात नाशिक इथं त्याच्या कलाकृतीला 'राज्य' पुरस्कार मिळाला आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याला देखील कलाक्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचं आहे . पण त्याची सुरवात करण्याआधी त्याला स्वतःचं एक मोठं ध्येय साध्य करायचं आहे, कलावंत म्हणून कलेसाठी एक धाडसी पाऊल घ्यायचं आहे. ते म्हणजे "त्याला भारतभरातील कलांचं दस्तावेजीकरण करायचं आहे. एवढंच नाही तर हे दस्तावेजीकरण करण्यासाठी तो लवकरच भारत भ्रमंतीला निघणार आहे .. तेही सायकल घेऊन ". प्रतीकची ही संकल्पना नक्कीच धाडसी आणि कौतुकास्पद आहे. भारतात जिथं जिथं कला जोपासली जाते , ज्या राज्य , शहर किंवा गावात कला संस्कृती आजही जतन करून ठेवली आहे अशा भारताच्या छोट्या मोठ्या सगळ्या शहरात तो सायकल घेऊन प्रवास करणार आहे. त्याची ही संपूर्ण संकल्पना अंमलात आणायला त्यानं नियोजनबद्धरित्या काम केलं आहे. साहाजिकच त्याच्या या हिंमतीला दाद दिल्या वाचून राहवत नाही.
कलाक्षेत्रात नावं व्हावं म्हणून बरीच लोक धडपड करीत असतात. पण २४ वर्षाच्या प्रतीकची धडपड मात्र स्वतःसाठी नसून या कलाक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, अनेक दुर्गम भागातील मुलं जे कलागुणांनी संपन्न असतात पण कलेचं शिक्षण असतं हे देखील ज्यांना माहित नसतं अशांसाठी आहे. याशिवाय अनेक दुर्गम भागातली छुपी कला शोधून काढणं हे देखील त्याचं उद्धिष्ट असून त्या कलांचं दस्तावेजीकरण हा देखील त्याचा मुख्य हेतू आहे. हे सगळं त्याला त्या त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊनच करायचं आहे म्हणून तर त्याची ही भारत स्वारी तो सायकलनं पूर्ण करण्याच्या त्याच्या निश्चयावर अगदी ठाम आहे.
सायकलचा त्याचा हा प्रवास मोठ्या नावीन्य पद्धतीनं त्यानं आखला आहे. प्रवास करतांना दर मैलावर होणाऱ्या प्रत्येक सूक्ष्म बदलांचा त्याला अनुभव घ्यायचा आहे. त्याच्या नोंदी तो लेखी स्वरूपात करणार असल्याचं त्यानं सांगितलं . शिवाय काही आवडणाऱ्या कलांचं , शहरांचं दस्तावेजीकरण, रेखाटनं आणि व्हिडीओ स्वरूपात करायचंदेखील त्यानं ठरवलं आहे. हा प्रवास पूर्ण करायला त्याला तब्बल एक वर्ष दोन महिने एवढा कालावधी लागणार आहे. दररोज अंदाजे ७० किलोमीटर एवढं अंतर सायकलनं कापून हा प्रवास करण्याचा त्याचा निश्चय आहे. या सगळ्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींनवर ताकदीनं मात करण्यासाठी तो मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहे याचा अंदाज त्याच्या बोलण्यातून नक्कीच जाणवतो.
अवघ्या २४ वर्षाच्या या तरुणात इतका आत्मविश्वास आणि ऊर्जा कुठून आली ? एकट्यानंच हा प्रवास सुरु करून येणाऱ्या कुठल्याही संकटावर भिडण्याची ताकद तु कुठून आणलीस ? तुझ्या कुटूंबातील लोक कशी साथ देतात ? असे प्रश्न त्याला लागोपाठ विचारल्यावर प्रतीक थोडा वेळ शांत बसला आणि मग दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, " मला कसलीही भीती नाही वाटतं कारण, मी सहावीत असतांना बाबांचं निधन झालं आणि बारावीत असतांना नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयांत प्रवेश घेतला तेव्हा आईची प्रकृती फारशी बरी नव्हती आणि अचानक तिनं देखील या जगाचा निरोप घेतला .... त्यामुळं मी नागपूरचं शिक्षण अर्धवट सोडलं... आणि स्वतःला थोडं सावरून जेजे मध्ये नव्यानं प्रवेश घेऊन शिक्षणाला सुरुवात केली ... आता माझ्या कुटुंबातला मी एकटा सदस्य आहे. नातेवाईक आहेत पण ते गावाकडं असतात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय कमी वयातच घेण्याची ताकद मला नियतीनं दिली आहे " प्रतीकच्या या उत्तरांनी मन क्षणभर सुन्न झालं ... पण त्याच्या खंबीरपणाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे .
सलग एक वर्ष दोन महिने चालणाऱ्या या त्याच्या भारत भ्रमंतीच्या प्रवासात त्याला जेवढं मानसिक बळ लागणार आहे तेवढंच शारीरिक देखील. त्यानं सायकल घेऊन भारत भ्रमंती करण्याचा निश्चय केल्यानंतर गुगलवर अनेक सायकलिस्टचा शोध सुरु केला. त्यात त्याला वाईतील रहिवासी असणारे ' प्रसाद एरंडे ' यांच्याविषयी बरीच माहिती मिळाली आणि फेसबुकसारखा सोशल मीडिया वापरून तो प्रसाद एरंडे यांच्यापर्यंत वाईत जाऊन पोहोचला. 'प्रसाद एरंडे' यांच्या नावे पाच गिनीज रेकॉर्डस् आहेत. त्यांनी देखील प्रतिकच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला प्रोत्साहन देत या प्रवासासाठी आपली सायकल भेट म्हणून तर दिलीच शिवाय २५ हजार किलोमीटरचा प्रवास करून एक नवीन रेकॉर्ड बनवण्याची संकल्पना देखील दिली. भारतातील २७ राज्य आणि २५ हजार किलोमीटरचा प्रवास सायकनं पूर्ण करणारा प्रतीक हा पहिला महाराष्ट्रीय ठरेल. प्रवासात येणाऱ्या अडचणींचा अनुभव आणि अभ्यास असणारे प्रसाद एरंडे रोज प्रतीकला ट्रेनींग देत आहेत. त्याचप्रमाणे जेजे चे माजी विद्यार्थी आणि चित्रकार संतोष काळबांडे हे देखील त्याला भरपूर प्रोत्साहन देत असल्याचं त्यानं सांगितलं.
ही भली मोठी सफर करतांना त्याला जेवण, तंबू , औषध, रस्ता शोधायला मदत करणारं GPS ,ऐतिहासिक ठिकाण बघतांना लागणारी तिकिटं इत्यादी खर्चासाठी आपल्या सगळ्यांची आर्थिक मदत त्याला नक्कीच लागणार आहे. साधारण २ लाख ६२ हजार इतका त्याला एका वर्षाचा खर्च येणार आहे. या सगळ्या प्रवासात आपण त्याला थोडं थोडं का होईना आर्थिक साहाय्य केलं तर नक्कीच प्रतीकचं एक ध्येय पूर्ण करण्यास त्याला आपण मदत करू शकू. ८९२८६ ८२३३० प्रतीकच्या या मोबाईल नंबरवर संपर्क करून आपण त्याला मानसिक आणि आर्थिक पाठबळ देखील देऊ शकता.
त्याच्या या अनोख्या कलाप्रवासाला तो २६ मे रोजी सुरुवात करणार आहे. त्याच्या या ध्येयवेड्या आणि रोमांचक अशा कलाप्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देऊ या !
त्याच्या या अनोख्या कलाप्रवासाला तो २६ मे रोजी सुरुवात करणार आहे. त्याच्या या ध्येयवेड्या आणि रोमांचक अशा कलाप्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देऊ या !
-स्नेहल बाळापुरे
Comments
Post a Comment