फक्त उरल्यात आठवणी ....!


"कधी काय होईल याचा नेम नसतो ?" अशी वाक्य जेव्हा प्रत्यक्षात अनुभव देतात तेव्हा खूप त्रास होतो .
कावळे सर आज आपल्यात नाही ही बातमी अशीच मनाला चटका लावणारी आहे . गणपती बसतात त्याच्या आधल्या दिवशी नेहमीप्रमाणे सरांचे गुड मॉर्निंग मेसेज आलेत . मी त्यांना गणपतीच्या आगमनाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्यावर्षी मला त्यांच्या मुलाकडं अमेरिकेत असताना कसा गणेशउत्सव साजरा होतो हे सांगायला त्यांनी खूप कौतुकानं फोटो पाठवले होते . यावर्षी मात्र ते नागपूरलाच होते आणि गणपतीमध्ये कामात असतील म्हणून मी ही फोन करून बोलणं टाळलं. आता असं राहून राहून वाटत एकदा बोलायला हवं होतं !
नागपूरच्या कॉलेजमध्ये सरांची मी एकटी विद्यर्थिनी होती कारण दुसरं कुणी नव्हतंच टायपोग्राफी शिकणार आणि शिकविणार. मी एकटी असले तरी ते मला रोज न चुकता शिकवायला यायचे . त्यांची कॉलेजमध्ये येण्याची वेळ कधीच चुकली नाही. ते वेळेचे खूप पक्के होते दिलेल्या वेळेत ते आमच्या ठरलेल्या जागी म्हणजे कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पुस्तक आणि मॅगझिन्स घेऊन बसायचे . मी उशिरा गेली किंवा कधी नाही गेली तरी त्यांच्या ठरलेल्या वेळी येऊन ते काम करत बसायचे .

संयमी ,शांत आणि गंभीर पण स्मितहास्य असणारा त्यांचा चेहरा ... कधीच कुणाविषयी वाईट बोलणार नाही आणि पुढचा बोलत असेल तर काही व्यक्त होणार नाही .
शिकवतांना सर म्हणून पण कॉलेज कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला बसलो की माझ्या वयाचे असायचे . आम्ही तासंतास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा करायचो . कायम पुस्तकांची देवाणघेवाण आमच्यामध्ये असायची . मला शिकवण्यासाठी नेहमी लेटेस्ट टायपोग्राफीवर बोलता येईल शिकता येईल अशी मॅगझिन्स विकत आणायचे आणि मला द्यायचे .

हे घे ! हे ठेव तुला वाच आणि मग चर्चा करू चहाबरोबर .
या उतारवयातही त्यांच्यात शिकण्याची जिद्द कायम होती. खुप कौतुक वाटत त्यांच , काळाच्या मानानं पाउल टाकण्याची त्यांची सवय. .. या वयात त्यानी आमच्या डिज़ाइन सॉफ्टवेयरचे क्लासेस लावले होते कोरलड्रॉ अणि फोटोशॉप शिकायला ते जायचे आणि आल्यानंतर शिकलेले सगळे टूल्स वापरून एक आर्टवर्क करायचे .. ते करत असतांना जेव्हा केव्हा त्यांना अडचण आली ते फोन करून विचाराचे . लोगो डिझाईन करताना ,फोटो काढताना , मोबाइल शिकताना जेव्हा कधीही त्यांना वाटलं की चर्चा करायची आहे ते बिनधास्त विचारायचे . त्यांनी कधीच ही लहान आहे , विद्यार्थिनी आहे हीच काय मत घ्यायचं असं कधीच केलं नाही . कायम त्यांच्या छोट्या मोठ्या कामावर आमची चर्चा असायचीच. मुख्य म्हणजे मी काही सुचवलं तर त्यांनी माझ्या मतांचं स्वागतच केलं .

त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची डायरी ... जी कायम त्यांच्यासोबत असायची . त्यांची डायरी बघताच कौतुकाचा वर्षाव झाला नाही तर ते कावळे सर काय !

सुंदर हस्ताक्षर ... कायम एका फॉन्ट (टाईप ) मध्ये ते लिहायचे इंग्लिश तसच मराठीचंही . जे आवडायचं ते लिहायचे त्यातच त्याच्या बाजूला कात्रणं चिकटवलेलं आणि काही ठिकाणी आवश्यक तसं स्केच केलेलं ... संपूर्ण डायरी बघताना कुठेच डिस्टर्ब होणार नाही असं लेआऊट ठेवायची त्यांची सवय ..सगळ्या डायऱ्या एकापेक्षा एक वेगळा पद्धतीने विषयानरूप केलेल्या .. कोरलड्रॉ शिकतांनाची त्यांची डायरी बघितली तर कळेल कि ती नुसतं चाळली तरी ते सॉफ्टवेअर कसं वापरायचं हे विषयाशी संबंधित नसणाऱ्यांनाही सहज कळेल असं सगळं त्यात त्यांनी लिहून काढलेलं होतं . नुसतं लिहिलाच नाही तर त्यात प्रत्येक टूल वापरून त्याचा वापर कसा होतो हे चित्रं बाजूला चिकटवलेलं होतं.


२८ सप्टेंबर ला सकाळी सकाळी सगळीकडे जुन्या गाण्यांचा मंद आवाज कानी पडत होता तेव्हाच सकाळी लोकसत्ता पेपरमध्ये लतादीदींचं निलेश जाधवांनी केलेलं स्केच पाहिलं त्यादिवशी म्हणजे २८ ला गानसरस्वती लता मंगेशकरांचा वाढदिवस होता म्हूणन जुने गाण्याचा आवाज होता आणि हे सगळं होत असतानाचं कावळे सरांची आठवण झाली, अरे !आज कावळे सरांचा वाढदिवस असं बोलून फोन हातात घेतला आणि क्षणार्धात लक्षात आलं . ओह्ह ! सर ... आता आपल्यात नाही , खूप खंत वाटली .. त्या दिवशी त्यांची मनापासून खूप कमतरता जाणवली . २८ सप्टेंबर २०१७ ला ची आठवण जागी झाली .. कॅन्टीनमध्ये हातात एक वर्तमानपत्र घेऊन आलेत ज्यावर लता मंगेशकरांचा फोटो व शुभेच्छानी भरलेला लेख होता . माझ्या पुढं तो पेपर ठेऊन म्हणाले " आज दुग्धशर्करा योग आहे " मी म्हंटलं हो का ? काय विशेष आज ? म्हणाले "आज कोकिळेचा आणि कावळ्याचा बर्थडे आहे!" काही सेकंद माझी ट्यूब पेटलीच नाही आणि विथ इन सेकंद लक्षात आलं .
ओह्ह ! कावळ्यांचा वाढदिवस आहे ... खूप हसलो आम्ही आणि तिथंच कॅन्टीनमध्ये बसून लतादीदींचे गाणे ऐकत पार्टी करून वाढदिवस साजरा केला ....
आता नाही मॉर्निग मेसेज नाही जुनी गाणी ... आता फक्त नि फक्त उरल्यात आठवणी ....

-- स्नेहल बाळापुरे   







-- स्नेहल बाळापुरे   

Comments

Popular posts from this blog