एक खंत उराशी राहील आता ...

आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि अचानक निघूनही जातात पण त्यांच्या या अशा अचानक निघून जाण्याने मन खिन्न होतं . त्यांच्या नसण्याची जाणिव ही तेव्हा तीव्र होते जेव्हा आपल्याला माहित होतं की आपल्या प्रवासाची सुरुवात या व्यक्तीच्या आशिर्वादाशिवाय , मार्गदर्शनाशिवाय शक्यच नाही, तेव्हा मात्र पुढचा मार्ग कठीण होऊन बसतो ....

PHD करायची म्हणजे काही दिग्गज लोकांच्या मार्गदर्शनाची गरज भासतेच.त्या संदर्भात मार्गदर्शन हवे म्हणून आणि माझ्या मनात विषय निवडीवरून जो गोंधळ होतोय त्या संदर्भात चर्चा करावी म्हणून"ग्रंथसखा"ग्रंथालयाचे प्रणेते "श्री श्याम जोशी" सर याना आज भेटायचे ठरले. त्यांनी दिलेल्या वेळात बदलापूर गाठून"ग्रंथसखा"मध्ये आमची चर्चा सुरु झाली . तिथे पेस्ट कंट्रोलचे काम सुरु असल्याने भल्या मोठ्या पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे जिकडे तिकडे नीट उभे करून ठेवले होते . ते बाजूला सारून आम्ही मधोमध चर्चा करायला बसलो . त्यांना मी टायपोग्राफी मध्येMFA केले असे सांगताच, त्यांनी म्हटलं पुढचा प्रवासही त्यातच करावा असे मत व्यक्त केले आणि माझा विश्वास वाढवला. इतरही विषयांवरआम्ही चर्चा केली, पण ती सारी इथे मांडली तर विषयांतर होईल .
आमची चर्चा रंगात आली असताना त्यांनी मला एक भलं मोठं पुस्तक काढून दिलं "दृश्यकला - खंड ६ " आणि म्हणाले निवांत बस आणि वाच. तुला हवी ती मार्गदर्शन करणारी मंडळी यात आहेत . त्या खंडाची पाने चाळून पाहत असतांनाच अचानक पेज नं ६२८ वर मी थांबले . त्या पेजवर होते मुकुंद गोखले सर . ज्यांना मी ओळखत होते . बरेचदा व्हाट्सअप, फेसबुक ,ई-मेल द्वारे आम्ही संवाद केला होता . त्यांचं नाव दिसताच मी जोशी सरांना सांगितले की मी भेटले आहे त्यांना . त्याच्या कौटुंबिक सोहळ्याचं मला आमंत्रण देखील होतं . जोशी सर आणि मी मुकुंद गोखले सरांविषयी,तसेच त्यांनी टायपोग्राफी , मोडीलिपी या क्षेत्रात केलेल्या त्यांच्या अफाट कामगिरी विषयी भरभरून गप्पा केल्या. या चर्चेतून मी तिथेच ठरवलं की आज रात्री गोखले सरांना मेल करायचा आणि सांगायचं की मी तुम्ही सांगितलेली सगळी पुस्तकं विकत घेतली आहेत. आता कसा अभ्यास करू ? आपली भेट शक्य आहे का ?.....

मनातल्या विचारांना आवरतं घेत , जोशी सरांशी चर्चा उरकती घेऊन मी त्यांचा निरोप घेतला कारण त्यांनाही दादरला एक महत्वाची मीटिंग होती . येताना मनात फक्त गोखले सरांचे विचार सुरु होते . आज दुपारी मी अचानक जे पेज उघडून बसले होते , ज्यात मुकुंद गोखले सरांची सारी कामगिरी दिली होती, ती जोशी सर बाहेर निघून गेल्यानंतर मी पूर्ण वाचून काढली होती आणि तिचाच विचार करत मी ट्रेनने घरी परत आले होते . घरी पोहोचताच सतीश नाईक सरांनी मला वाईट बातमी दिली ... गोखले सर नाहीत आता .... माझा विश्वासच बसला नाही अजूनही बसत नाही आहे ... ज्यांच्या विषयी मी संपूर्ण प्रवासभर विचार करत होते . त्यांना ई-मेल करताना काय काय लिहायचे ? याचाच विचार करत होते ... आणि ही अशी अचानक बातमी. ? ऐकून डोकं सुन्न झाले ... काय करावं हेही सुचेना.



मुकुंद गोखले सरांची माझी ओळख सतीश नाईक आणि रंजन जोशी सरांनी करून दिली. मी २०१७ मध्ये MFA साठी लघुशोध प्रबंध करताना " अक्षरशास्त्रातील प्रायोगिकता - चिकित्सक अभ्यास " हा विषय निवडला होता . मला या प्रबंधासाठी गोखले सर , रंजन सर आणि दत्तात्रय पाडेकर सर यांची मुलाखत हवी होती . गोखले सरांना तेव्हा मी पुण्याला जाऊन त्यांना भेटणार होते . पण अचानक त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी मला फोनवरून कळवले , आणि म्हणाले , तुला जे काही विचारायचं आहे ते मला ई-मेल करून कळव मी बरा झालो की त्याचं उत्तर देईन तुला .... तिथूनच आमचा संवाद सुरु झाला . मला मराठी टायपिंग येत नव्हतं आणि माझी मराठी त्यांच्या तुलनेत अशुध्दच ...मी त्यांना एक ई-मेल केला मराठीतुन त्यावर त्यांनी जे उत्तर लिहून पाठवले ते वाचून तर मी थक्क झाले. नंतर मात्र मी त्यांना एक एक शब्द लिहिण्यासाठी देखील शंभर शंभर वेळा विचार करू लागले .. त्यांनी माझ्या ई-मेल मधल्या शुद्धलेखनाच्या आणि भाषेच्या ज्या काही चुका काढल्या ते पाहून मला वाटलं की आता हे मला कधीच पुढे उत्तर देणार नाहीत , मग मुलाखत तर दूरच .... पण माझा हा गैरसमज होता .... त्यांनी मला छान मार्गदर्शन केलं तेव्हा. तेव्हा मी कुठे चुकले होते ते तर आजही आठवलं की मला माझ्या मूर्खपणावर कीव आल्यावाचून राहवत नाही ..... पण त्यांनी मला सारं काही खूप छान समजावून सांगितलं होतं . मध्यंतरी फारसे बोलणे नाही झाले .
आणि अचानक मे महिन्यात त्यांचा मेसेज आला. त्यात त्यांनी मला त्यांच्या पारिवारिक अभिनंदन सोहोळयाचे निमंत्रण दिले होते . ज्या दिवशी सोहळा होता त्या दिवशी माझ्या दातांची सर्जरी होती ...पण मी ती कॅन्सल केली आणि लगेच नागपूरला त्या सोहळ्याला गेले . तो सोहळाही माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला , कारण मी प्रत्यक्षात त्यांना तिथेच पहिल्यांदा भेटले होते . मुंबईत आल्यावर देखील पुण्यात जाऊन त्यांना भेटायचे असे मी ठरवले होते, पण तेव्हा देखील त्यांच्या तब्येतीमुळे ती संधी हुकली . पण आता तर हा योग् कधीच नाही येणार ... माझ्या विषयात त्यांचे मार्गदर्शन आता मला कधीच मिळणार नाही याची रुखरुख कायम वाटत राहील ... गोखले सर, तुम्ही कायम स्मरणात असाल .... तुमची लोकविलक्षण कामगिरी , तुमची काम करण्याची पद्धत , तुमचा थोड्या कालावधी का होईना लाभलेला सहवास अगदी आयुष्यभर लक्षात राहील ...

--- स्नेहल बाळापुरे

Comments

Popular posts from this blog