असं ही एक प्रेमाच रिटर्न गिफ्ट ..

काय काळ बदलतोय ! नाही ! कौतुक करावं तेवढं थोडं हो ! या काळाचं .. 
हल्ली प्रत्येक ठिकाणी रिफंड मिळतं हो . बाजारात , ऑनलाईन शॉपिंग, एवढंच काय तर आमच्या सोसायटीच्या बाहेरचा भाजीवाला  भय्यापण हल्ली भाजी खराब निघाली तर रिफंड देतो अजून काय हवंय ? तुम्हीच सांगा ! पण मला असं वाटतं की माणुसकीच्या बदल्यात पण माणुसकीच मिळावी ( रिफंड व्हावी) .  पण, घडतं मात्र विपरीतच . काही ठिकाणी एवढी माणुसकीची  ट्रान्स्परन्सी दिसत असताना माझ्या मैत्रिणीला मात्र प्रेमाच्या रिफंडमध्ये "असह्य वेदना"च मिळाल्या .  
होय ! ही एक खरी गोष्ट आज तुमच्या पुढं  मुद्दाम मांडते आहे . ही तर माझ्या जवळच्या मैत्रीणीची गोष्ट आहे पण असं किती तरी मुलींबरोबर होत असेल ज्या समाजाच्या भीतीने आजही कुठे तरी देशाच्या, शहराच्या किंवा एखादया गावाच्या कानाकोपऱ्यातया असंख्य असह्य वेदना मनात  दाबून  रोज गुपचूप रडून गप्पपणे जगत असतील. 
आता तर एक ट्रेण्ड सुरु झाला आहे  की , तुमच्यावर (मुलींवर ) "मी टू हॅश टॅग" लिहून पोस्ट केलं की लगेच कळतं की ओह्ह ... ! हिच्या सोबत देखील ती वाईट गोष्ट झाली. पण प्रश्न हा आहे की ज्या मुलींना "मी टू हॅश टॅग " हे ही धड लिहायला जमत नाही(लिहिता वाचता येत नाही अशा ) त्यांच काय करायचं ? आणि ज्यांना लिहायला जमत (सुशिक्षित ) पण कुटुंब, समाज यांच्या भीतीने कधी पुढे  येण्याची हिम्मतच केली नाही अश्यांचं  काय ? असे अनेक गंभीर प्रश्न दडून बसलेले आहे .  

माझ्या ऑफिसमधली माझी मैत्रीण (नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळते आहे ) जवळ जवळ एक वर्ष आम्ही सोबत काम केलं नंतर मी ती नोकरी सोडली आणि तिला देखील पुण्यात चांगली नोकरी मिळाली. आम्ही दोघी दोन भिन्न शहरात राहत असलो तरी अधून मधून संपर्कात होतोच . एक वर्ष जवळ जवळ सोबत काम केल्याने तिचा स्वभाव पुरेसा कळला होताच आणि तिच्या आयुष्याचं सिक्रेट , प्रोब्लेमम्स  ती नेहमीच सांगायची आणि मत दिलं तर एकूण आवश्यक ते बदल ही करायची . स्वभाव चांगला आहे तिचा हुशार ही  आहे पण बरेचदा सतत भीतीत जगते आहे असं वाटायचं . पण मी कधी विचारलं नाही.  अगदी नवी वर्ष २०१८ सुरु होण्याआधीची गोष्ट.  तिचा मला फोन आला आणि म्हणाली खूप आठवण येते आहे तुझी भेटायचं का ?  बरच काही सांगायचं आहे भेटूया का प्लिज ? मी म्हंटल ठीक आहे भेटू या . आम्ही ठरवून भेटलो ... भरपूर गप्पा गोष्टी झाल्यात . मज्जा मस्ती झाली . तीच रडून पडून फ्रस्टेशन निघालं आणि ती मोकळा श्वास घेऊन बोलली , वाह्ह ! खूप हलकं वाटतंय यार ..  .केलं मी "ब्रेक अप" त्या मुलासोबत. तो मानसिक आजारी आहे हे तिला कळून चुकलं होत . सुरुवातीच्या काळात तिने ही  गोष्ट घरी सांगितली घरून आधीच त्या मुलासाठी विरोध होताच , पण तो मानसिक रोगी आहे हे कळल्यावर  तिने हे प्रेम प्रकरण थांबवलं हे पाहून कुटुंबांनी चांगला आधार दिला . तेव्हा गोष्टींमधून  कळलं ती का भीतीत जगत होती.  तिच्या लग्नाची चर्चा घरी सुरू झाली एक दोन मुलं पाहायला देखील आले पण कुंडलीत दोष आहे असं घरच्या पंडितने सांगितल्यावर लग्न हा मुद्दा थोडा लांबणीबावर गेला. तीने या सगळ्या गोष्टीतुन बाहेर निघून नोकरीवर चांगलं फोकस केलं  हे सगळं तिने भेटीत सांगितलं होत . अधून मधून कळायचं जॉब मस्त सुरु आहे आणि ती आनंदी आहे . आम्ही आपल्या -आपल्या  कामात परत व्यस्त झालो . 

इथून आठ - पंधरा दिवसाआधी तिचा फोन आला . माझ्या कडून  फोनवर दुर्लक्ष झालं पाहिलं ते तिचे  व्हाट्सअपवर  खूप मेसेज होते आणि ते पाहून तिला कॉल केला तर ती खूप रडत होती  मी विचारलं काय झालं? शांत हो .  ती म्हणाली तो मुलगा ज्यांच्या सोबत काही महिन्या आधीच संबंध तोडला संपर्क सोडला तो हिला गेले दोन-तीन महिने रोज वेगळ्या वेळा नंबरहुन त्रास देत होता  ,
तिने एक नंबर ब्लॉक केला की  हा दुसरा नंबरहुन कॉल करायचा ... तिला म्हंटल पोलीस कंप्लेंट करायचीना तर ती म्हणाली  नाही यार! घरचे चिंता करतील कशीही नोकरी चांगली सुरु आहे बंद करायला लावतील .. नको नको .. मी म्हंटल ठीक.  तुला जे योग्य वाटतं  ते कर काळजी घे . 

आज सकाळी परत फोन आला ..फोन उचलताच खूप जोरात रडणं सुरु केलं आणि तिचे शब्द एकूण कान , डोकं सुन्न झालं. तिच्या आवाज ऐकूनच थोडी धडकी भरली होती ... 
ती म्हणाली यार माझा सोबत खूप वाईट झालं मी म्हणलं म्हणजे नेमकं काय झालं .... तीच रडू तिला आवरेचना..  शांत हो ... सांग काय  झालं ?
त्या मानसिक रोगी मुलाने  काल  तिच्या ऑफिसपुढं येऊन तमाशा केला .. तेवढंच करून थांबला नाही तर रात्री तिच्या ऑफिसहून घरी जाण्याच्या रस्त्यावर तिला अडवून तिच्या पायावर रॉड मारला आणि सोबत जो ऑफिसमधून तिच्या  बरोबर एकाच रस्त्याने जाणार तो मुलगा( ऑफिस कलीग )होता त्याला देखील मारलं . तो ऑफिस कलीग तिथेच जखमी पडला होता  आणि हिच्या सोबत  त्याने (मानसिक रोगी )मुलगा बळजबरी करू लागला . कसे तरी आरडा ओरडा करून  ती आणि ऑफिस कलीग पळत सुटले आणि जीव वाचवून घरी पोहचले .. 
हे सगळं एकूण माझं  डोकं काम नव्हतं करत .. सगळं सुन्न झाल्यासारखं वाटलं .. मी भानावर येत म्हटलं की ,घडला प्रकार पोलिसांना सांग तर तीच परत तेच सुरु  झालं ..  नको पोलीस अब्रू काढतात .. नको उगीच गोष्ट नाही वाढवू .. घरी कल्पना दिलीस का ? म्हणाली  हो दिली पण माझी नोकरी जाणार आता ... मला लोक काय म्हणतील , पोलीस घरी आलेत तर सोसायटी नाव ठेवेल.. आधी कुंडली नाही जुळत म्हणून लग्न नव्हतं होत .. आता हे ऐकून  तर जुळणारच नाही .. काय चुकलं माझं  प्रेम करून .. खरं प्रेम होत.  आधी पण असाच एकदा त्रास दिला होता म्हणून कळलं की  हा लग्नासाठी योग्य नाही आणि दूर होण्याचा निर्णय घेतला होता.
"जसं प्रेम केलं ना तेवढयाच ताकदीचं राग, व्देष  रिटर्न रिफंड म्हणून देऊन गेला " काय रिटर्न गिफ्ट दिल ग...  त्याने ! काय करून ठेवलं माझं ..   

नेहमी धमकी देणं,मारणं हा प्रकार होता पण ती  घरच्यांच्या काळजीपोटी  चूप होती आणि काळजीपूर्वक त्याच्या  दूर झाली होती  पण काल रात्री तिच्या जीवावर बेतलं .. घरीही सगळे तिलाच  आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करीत आहे . काय बोलावं या प्रकारावर काही कळत नाही ..खरंच फक्त "मी टू  हॅश टॅग " ने भागणार आहे का ? गुन्हेगारांचे  गुन्हे ,आरॊप पुढे येतील पण गुन्हगाराच्या  शिक्षेचं काय ?  ज्या ज्या मुलींवर  मेंटल, फिजिकली टॉर्चर  छोट्या मोठया प्रमाणात करून जो आरोपी पळून जातो त्यांना काय आणि कुठली शिक्षा देणार ?

ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवतो त्या मुली , स्त्रिया मात्र आयुष्यभरासाठी इच्छा नसूनही या नको असलेल्याला प्रसंगाची शिक्षा कायम  दोन्ही ठिकाणी भोगतात . एक  स्वतः च्या मनात आणि दुसरी नेहमी अवहेलना करणाऱ्या समाजाच्या नजरेत .. 
मी एवढचं म्हणेन की , आपणही या समाजाचा एक भाग आहे , जर आपण काही करू शकत नसू तर एवढं तर नक्कीच करू की , निदान अशा प्रसंगामधून जाणाऱ्या व्यक्तीला दुरून टोमणे मारून खच्चीकरण करण्यापेक्षा प्रसंगावधान राखून त्यांना बोचेल असे कृत्य, वर्तन नक्कीच नाही करू  . निदान माणूस म्हणून माणुसकी तर नक्कीच नाही विसरू . 

--

Comments

Popular posts from this blog