
आमच्या 'भुलाबाई' अन कोजागिरी !! काल कोजागिरीच्या निमित्त्यानं बालपणीच्या खूप आठवणीना उजाळा मिळाला .... आधी शिक्षणासाठी मग नोकरीसाठी आम्ही गावाबाहेर पडलो आणि मग हळूहळू अशा सणाची गंमत कधी मागे पडत गेली कळलंच नाही. काल कित्येक वर्षांनी या छोट्याशा सणाचा मोठा आनंद घेता आला कारण हि तसंच होतं. लोकडाऊनमध्ये गावी राहता आलं त्यामुळं बऱ्याच वर्षांनी विदर्भात साजऱ्या होणाऱ्या कोजागिरी अन 'भुलाबाईचा' आनंद घेता आला. कोजागिरी तर महाराष्ट्रात किंवा बाहेर कुठेही साजरी होते पण 'भुलाबाई' बसवून ती साजरी करण्याची एक वेगळी प्रथा आमच्या गावाकडे आहे. विदर्भात काही खेड्यांमध्ये भाद्रपद पौर्णिमा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे सलग एक महिन्याच्या, तर काही ठिकाणी कोजागिरीच्या दिवशी 'भुलाबाईचं' आगमन करतात. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. 'भुलाबाई' हे नावं कसं पडलं हे तर मला सांगता येणार नाही पण आजी सांगायची भुलाबाई (पार्वती) आणि भुलोजी (शंकरजी )आहेत. या दोघांच्या दोन वेगळ्या किंवा एकत्र बसलेल्या मातीच्या छोट्या आकाराच्या मुर्त्या तयार क...